ठाण्यातील शाळांचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी
ठाण्यातील शाळांचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी
पोलीस उपायुक्तांना ‘बहुजन शक्ती’चे निवेदन
ठाणे दि.२४ ( अजय मगरे )
बदलापूर येथील चार वर्षाच्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे,वागळे विभागातील बहुजन शक्ती सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने, अध्यक्ष तुळशीराम मगरे यांच्या नेतृत्वात शनिवारी ठाणे शहर परिमंडळ ५ चे पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव यांची भेट घेऊन आपल्या परिमंडळ ५ हद्दीतील सर्व शाळांचे सुरक्षा ऑडिट करावे अशी मागणी केली.
शाळांमधील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करणे आवश्यक असून शाळेत आणि शाळेच्या परिसरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत कि नाही याची तपासणी पोलीसांमार्फत करावी. स्कुल बसची व्यवस्था नियमाप्रमाणे आहेत का? तसेच बदलापूर मधील घटनेमुळे पालकांमध्ये शाळांमधील सुरक्षाविषयक चिंता वाढली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमधील उपाययोजनांची आपल्या स्तरावर आढावा घेणे गरजेचे आहे.
त्यानुसार कृपया आपल्या परिमंडळ हद्दीतील सर्व शाळांना भेटी देऊन या शाळांचे सुरक्षा व्यवस्थापन तपासावे. तसेच शाळांमध्ये सुरक्षा आणि पालकांशी संवाद आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढवावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हाअध्यक्ष अनिकेत मोरे ,भारतीय बौध्द महासभा अंबिका नगर २ शाखा अध्यक्ष सुशांत साबळे,बहुजन शक्ती न्यूज चे संपादक अजय मगरे,सुशिल शरणागत,सुरज मगरे आदी उपस्थित होते. आपल्या विभागातील शाळांना भेटी देण्यात येत असून शाळेच्या सुरक्षेच्या संदर्भात पावले उचलू असे आश्वासन उपायुक्तांनी यावेळी दिले.