कोपरगांवात हिंदी दिन कार्यक्रम उत्साहात साजरा..
राष्ट्रभाषा संवर्धन मंच आणि स्व. र.म. परिख ग्रंथालय तर्फे हिंदी दिन कार्यक्रम उत्साहात साजरा..
कोपरगाव, दि.२७ ( दिलीप गायकवाड )
राष्ट्रभाषा संवर्धन मंच आणि स्व. र.म. परिख मराठी तथा हिंदी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने एस.एस.जी.एम. महाविद्यालयात 24 सप्टेंबर 2024 रोजी हिंदी दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. रंजना वर्षे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे कार्यवाहक सुरेश गोरे यांनी केले.
प्रमुख अतिथी आणि हिंदी ग्रंथालयाचे अध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी आपल्या भाषणात हिंदी ही राष्ट्रभाषा असून ती आपली मावशी असल्याचे म्हटले. त्यांनी वाचन संस्कृतीचा प्रचार आणि ग्रंथालयाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी वाचनालयातील पुस्तके घरपोच उपलब्ध करून दिली जात असली तरी त्याचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
कोपरगावचे तहसिलदार महेश सावंत यांनीही हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी चाणक्याच्या तत्त्वांचे पालन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उज्वला भोर यांनी हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले आणि विविध भाषांमधील एकात्मतेवर भर दिला. त्यांनी संत कबीर, मीराबाई आणि मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान हिंदी दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा, काव्य वाचन आणि दिप्ती पत्रिका वाचन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भागवत देवकाते यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनिल काकडे, सुरेश गोरे आणि शोभनाताई ठोळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल योगेश कोळगे, लिपीक प्रमोद येवले आणि डॉ. रंजना वर्धे यांनी विशेष परिश्रम घेतले.