मातंग समाज क्रांती मोर्चाचे आमरण उपोषण सुरू!
मातंग समाज क्रांती मोर्चाचे आमरण उपोषण सुरू!
अण्णाभाऊ साठे स्मारक समितीला भूखंड द्या…
कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…
कोपरगाव, दि.३० ( दिलीप गायकवाड )
मातंग समाज क्रांती मोर्चाने आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा शासकीय इतमामात करण्याची मागणी सर्वांत प्रमुख आहे. यासोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्याची तसेच स्मारकामागील भूखंड अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या नावावर हस्तांतरित करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
मातंग समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, मागील १२ वर्षांपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम रखडले होते. तीन वर्षांपूर्वी पुतळा उभारला गेला असला तरी अद्याप कोपरगाव नगरपरिषदेने त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला नाही. “नगरपरिषदे कडून या कार्यक्रमास इतका विलंब का होत आहे?” हा प्रश्न समाज बांधवांना सतत पडत आहे, परंतु अद्यापपर्यंत याबाबत समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
तसेच, कोपरगावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह गेल्या ११ वर्षांपासून त्याच्या सुशोभिकरणासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. या नाट्यगृहाच्या सुशोभिकरणासाठी निधी मंजूर असतानाही काम सुरू न झाल्याने समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.
या तिन्ही मागण्या मान्य होईपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारका जवळ आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा मातंग समाज क्रांती मोर्चाचे अनिल जाधव, दौलत शिरसाट, संदिप निरभवणे, रवी डोलारे आदी कार्यकर्त्यांनी दिला आहे.
तसेच बहुजन शक्ती सामाजिक संघटनेने मातंग समाज क्रांती मोर्चाच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा दिला असल्याचे दिलीप गायकवाड यांनी सांगितले.