सोयाबीनला ५ हजार हमी भाव मिळावा..


सोयाबीनला ५ हजार हमी भाव मिळावा..

कोपरगांव शेतकऱ्यांची मागणी..

कोपरगांव, दि. २१ (दिलीप गायकवाड)

कृषी उत्पन्न बाजार समिती, कोपरगांव येथील मुख्य मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे भाव घसरले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सध्या सोयाबीनला मिळणारा भाव ३८०० रुपये ते ४३९५ रुपये दरम्यान आहे, तर केंद्र सरकारने हमी भाव ४८०० ते ४९०० रुपये ठेवला असल्याचे वृत्त आहे. मात्र, प्रत्यक्ष बाजारात मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांना परवडत नाही.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसाच्या संकटातून वाचलेल्या आणि सोंगणी, मळणी केलेल्या सोयाबीनला मिळणारे कमी भाव पाहता, शेतकऱ्यांना आपले पीक मातीमोल भावात विकण्याची वेळ येत आहे.

Advertisement

सोंगणीसाठी लागणारा खर्च ५ ते ६ हजार रुपये आहे, तर मळणीसाठी मशीनचा खर्च दोनशे ते तीनशे रुपये प्रति पोते घेतला जातो. शिवाय, एक एकरमध्ये सरासरी १० पोते सोयाबीन मिळते. मेहनत आणि मशागत यांचा विचार करता, शेतकरी आपल्या कष्टाचे योग्य मूल्य मिळत नसल्याची भावना व्यक्त करत आहेत.

सणासुदीचे दिवस आणि दिवाळी जवळ आल्याने, शेतकऱ्यांना मजूरवर्गाचे पगार आणि पुढील पिकासाठी मशागत करण्यासाठी उत्पन्नाची नितांत गरज आहे. परंतु मिळणारे कमी भाव शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट करत आहेत. त्यामुळे, शेतकरी किमान ५ हजार रुपये हमी भावाची मागणी करत आहेत.

त्यांना व्यापाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने सरकारने हस्तक्षेप करून हमी भाव मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे

सरकारने सोयाबीनला ५ हजार रुपये हमी भाव दिल्यास आम्हा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. सद्या बाजारात दर खूपच कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च निघणे अवघड झाले आहे. असे शेतकरी नेते बाळासाहेब जाधव पाटील यांनी बहुजन शक्ती न्युज’ला सांगीतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!